इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामात शनिवारी, लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा आठ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात लखनौच्या विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीचीच जास्त चर्चा झाली. धोनीने तुफानी फलंदाजी करत या सामन्यात 9 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 28 धावा केल्या. या काळात धोनीचा स्ट्राईक रेट 311.11 होता.
या सामन्यात आपल्या झंझावाती खेळीदरम्यान धोनीने पुन्हा एकदा सिद्ध केले की डीआरएस घेण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. धोनीने त्याच्या बॅटिंग दरम्यान वाईड बॉलसाठी रिव्ह्यू घेतला, जो यशस्वी ठरला. ही संपूर्ण घटना सीएसकेचा डाव सुरू असताना 19व्या षटकात घडली. त्या षटकातील मोहसीन खानचा पहिला बॉल वाईड होता. यानंतर मोहसिनने पुढचा बॉलही ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकला, मात्र यावेळी मैदानावरील अंपायरने तो बॉल वाईड दिला नाही. त्यावेळी धोनीने लगेच रिव्ह्यूचा निर्णय घेतला. थर्ड अंपायर ब्रुस ऑक्सनफोर्ड यांनी रिप्ले पाहिल्यानंतर चेंडू रेषेच्या बाहेर असल्याचा निष्कर्ष काढला आणि तो बॉल वाईड दिला. बॉल रेषेच्या अगदी बाहेर होता आणि धोनी तेव्हा मधल्या स्ंटपचा गार्ड घेत होता, हे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे धोनीचा निर्णय बरोबर ठरला आणि धोनी रिव्ह्यू सिस्टीम पुन्हा हिट ठरली.
DRS ला धोनी रिव्ह्यू सिस्टीम का म्हटले जाते ?
डीआरएस चा मूळ अर्थ डिसिजन रिव्ह्यू सिस्टम (Decision Review System )असा आहे. पण धोनीच्या अद्वितीय कौशल्यामुळे आजकाल त्याला धोनी रिव्ह्यू सिस्टम (डीआरएस) असेही म्हणतात. डीआरएसचा वापर खेळाडू अंपायरच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी करतात. धोनीने डीआरएस घेतला आणि अंपायरचा निर्णय बदलला असे अनेक वेळा घडले आहे.
धोनीची तूफान फटकेबाजी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेव्हा देशाकडून खेळत होता, तेव्हाही त्याचे अनेक DRS निर्णय अगदी अचूक ठरले. विकेटकीपिंग करतानाही त्याने मागून बारीक लक्ष ठेवले. यामुळेच डीआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टीम म्हटले जाऊ लागले. धोनी डीआरएसमुळेही सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. धोनीने IPL 2024 मध्ये एकूण सात डावात 87 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट 255.88 आहे.
धोनीचा इंटरनॅशनल रेकॉर्ड
42 वर्षीय एमएस धोनीने 350 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या, ज्यात 10 शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात 183 (नाबाद) धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. एकदिवसीय सामन्यात त्याने विकेटच्या मागे 444 विकेट घेतल्या. धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 6 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत.