Monday, December 23, 2024
HomeBlogइचलकरंजी : सांगली रोडचे नागरिक आक्रमक :... अन्यथा मोठे जन आंदोलन छेडणार

इचलकरंजी : सांगली रोडचे नागरिक आक्रमक :… अन्यथा मोठे जन आंदोलन छेडणार

इचलकरंजी/ताजी बातमी टीम

प्रभाग क्रमांक 17 मधील दैनंदिन साफसफाई, स्वच्छता व नागरी सुविधा संदर्भात वारंवार मागणी करुनही महानगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्षच केले जात असल्याने भागातील संतप्त नागरिकांनी महापालिकेत येऊन उपायुक्त प्रसाद काटकर आणि स्मृती पाटील यांना घेराव घालत प्रश्‍नांची सरबत्ती केली. या भागातील प्रश्‍नांची तातडीने निर्गत न केल्यास जनआंदोलनासह महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण छेडण्याचा इशारा माजी आरोग्य सभापती संजय केंगार यांनी दिला आहे.

साईट नं. 102, आसरानगर, कामगार वस्ती, मळेभाग, 300 खोल्या आदींसह वृंदावन, सुरभि, निशीगंधा, गुलमोहोर, शिक्षक कॉलनी, सहकारनगर, वडगांव बाजार समिती या भागात दैनंदिन स्वच्छता आणि साफसफाईची वाणवा आहे. त्याचबरोबर या भागात असलेल्या सार्वजनिक शौचलयांची दूरवस्था झाली आहे.

शिवाय सांडपाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे भागातील संतप्त नागरिकांनी माजी आरोग्य सभापती संजय केंगार यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त प्रसाद काटकर व उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी विशेषत: महिलांनी दोन्ही अधिकार्‍यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली.

या प्रभागातील सर्वच भागात कर्मचारी नेमले असले तरी दैनंदिन स्वच्छता, कचरा उठाव आणि गटारींची स्वच्छता केली जात नाही. कचरा उठाव होत नसल्याने भागाभागात कचर्‍याचे ढीग साचले आहेत. या संदर्भात विचारणा करता कर्मचार्‍यांकडून नागरिकांना उध्दट उत्तरे दिली जातात.

या भागातील साईट नं. 102 म्हसोबा मंदिर परिसर, एमएसईबी लगत आणि साठे वसाहतीजवळील सार्वजनिक शौचालयांची दूरवस्था झाली आहे. त्यांच्या दूरुस्तीची मागणी करुनही केवळ आश्‍वासनांशिवाय काहीच मिळत नाही. साईट नं. 102 मधील पुनर्वसित झोपडपट्टीतील गटारींमधील सांडपाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही.

याठिकाणचे सांडपाणी जाधव मळा लगत असेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ मोठा खड्डा काढून त्यामध्ये सोडले आहे. मागील 20 वर्षांपासून सांडपाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आवळे पाणंद ओढ्यापर्यंत सारण गटार किंवा भूयारी गटार करुन निचरा करण्याची गरज आहे.

या परिसरातील गोरगरीब होतकरु विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी सेंटर व लायब्ररीची इमारत उभारली जात आहे. परंतु या आरक्षित जागेलगतच असलेल्या रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी सार्वजनिक शौचालय या आरक्षित जागेत उभारले जात आहे. ते काम तातडीने थांबविण्याची व अन्यत्र करण्याची गरज आहे. याशिवाय भागातील अनेक कुपनलिका बंद अवस्थेत असल्याने एैन उन्हाळ्यात नागरिकांना वणवण करावी लागत आहे. या सर्व प्रश्‍नांची निर्गत लवकरात लवकर न झाल्यास महापालिकेच्या प्रवेशद्वारातच उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी मिंटू सुरवसे, पप्पू दास, चंद्रकांत चौगुले, अजय पाचंगे, संदीप भडंगे, कृष्णा लोहार, राजू होगाडे, शिवाजी लोहार, सुनिल खटावकर, उत्तम बुळगे, एकनाथ पारसे, भिमा बनपट्टे, चंद्रकांत शिंगाडे, बंदेनवाज मोमीन, गणेश भंडारे, प्रकाश बनपट्टे, महादेव आठवले, अमित माच्छरे, अविनाश आवळकर, प्रकाश घाडगे, सखुबाई कुराडे, शमशाद शेख, मंगल ढमणगे, लता एकशिंगे, विमल नेटके, बेबीताई भिऊंगडे, संगीता कसबे, सुलाबाई आवळे, मंगल सुतार, कलाबाई आवळे आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -