Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी सत्तेवर येताच क्रांतिकारी गोष्टी घडल्या; NEET मधील गडबडीवरुन जयंत पाटलांचा कचकाटून...

मोदी सत्तेवर येताच क्रांतिकारी गोष्टी घडल्या; NEET मधील गडबडीवरुन जयंत पाटलांचा कचकाटून चिमटा

नीट परीक्षेतील गडबडीने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. नीट परीक्षेतील या गोंधळावर जयंत पाटील यांनी मोदी सरकारला भीमटोला हाणला आहे.

 

देशभरात नीट परीक्षांवरून जबरदस्त गोंधळ सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. तर एकामागून एक आरोपी सापडत आहेत. या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी घडत आहेत. याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा घेरले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

 

आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही आहेत, असा टोला त्यांनी लगावला. त्यांचा रोख नीट आणि इतर परीक्षेतील गडबडींवर होता.

 

केंद्र सरकारचा तरुणाईच्या भविष्याशी खेळ

 

पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे अशी गंभीर आरोप त्यांनी केला.

 

तर याची जबाबदारी केंद्राची

 

या अनागोंदीमुळे तरुण-तरुणी उद्विग्न झाले आहेत. उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल असा इशाराही पाटील यांनी दिला. त्यांनी सरकारच्या धोरणावर आणि परीक्षा प्रक्रियेवर सडकून टीका केली. देशात नीट पाठोपाठ नेट परीक्षेतही मोठी अनागोंदी उघड झाल्याने विरोधकांनी आता केंद्र सरकारवर चौफेर हल्ला चढविला आहे.

 

राज्यांना द्या परीक्षांचे अधिकार

 

अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? असा सवाल उपस्थित करत असताना प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी, मात्र केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -