Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास ‘सर्वाधिक साखर निर्याती’चा पुरस्कार जाहीर

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास ‘सर्वाधिक साखर निर्याती’चा पुरस्कार जाहीर

इचलकरंजी

नॅशनल फेडरेशन ऑफको-ऑप. शुगर फॅक्टरीज् नवी दिल्ली या देश-विदेशातील साखर उद्योगासाठी सल्ला, संशोधन व मार्गदर्शन करणार्‍या संस्थेकडून कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास सन 2022-23 या 30 व्या गाळप हंगामात देशातून ‘सर्वाधिक साखर निर्यात’ केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र शासनाच्या निर्णयानुसार कारखान्याने सन 2022-23 या हंगामात एकूण 1.15 लाख मे. टन साखरेची निर्यात केलेली आहे. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रलायातील केंद्रीय मुख्य संचालक (साखर) नवीदिल्ली यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या निवड समितीकडून देशातील साखर कारखान्यांनी सादर केलेल्या माहितीचे गुणात्मक मुल्यांकन केल्यानंतर या पुरस्काराची निवड करण्यात येते. सदर मुल्यांकनानंतर सन 2022-23 हंगामात ‘सर्वाधिक साखर निर्यात’ केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केल्याचे नॅशनल फेडरेशन या संस्थेने कारखान्यास कळविले आहे. सदर पुरस्कार लवकरच नवीदिल्ली येथे विशेष समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

ऊस गाळप हंगाम कालावधीत देशातील सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा, तांत्रिक कार्यक्षमता, ऊस विकास योजनेची कार्यवाही, साखर निर्यात याबाबत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रत्येक हंगामासाठी कारखान्यांना नॅशनल फेडरेशनकडून अशा पुरस्कारांनी गौरविण्यात येते. जवाहर कारखान्यास यापूर्वी साखर संघ मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) पुणे तसेच नॅशनल फेडरेशन या संस्थेकडून प्रभावी ऊस विकास, उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, योग्य आर्थिक व्यवस्थापन, ऊर्जा बचत, सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना, पर्यावरण व्यवस्थापन अशा पुरस्कारांनी गौरविलेले आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कारखान्यावर सभासद शेतकर्‍यांनी दाखविलेल्या विश्‍वासास पात्र असल्याचे या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत केले आहे. त्यामुळे कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद-शेतकरी, ऊस तोडणी मजूर-वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी- कर्मचारी-कामगार या सर्वांचे अभिनंदन कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले आहे.

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याने शेतकर्‍यांसाठी पहिल्या हंगामापासून विविध ऊस विकास योजना, वैद्यकीय अर्थसहाय्य योजना राबविल्या आहेत. तसेच कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना कार्यरत आहेत. या पुरस्कारामुळे कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -