Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगऐश्वर्या रायबद्दल इमरान हाश्मीची वादग्रस्त टिप्पणी; अखेर अभिनेता माफी मागण्यास तयार

ऐश्वर्या रायबद्दल इमरान हाश्मीची वादग्रस्त टिप्पणी; अखेर अभिनेता माफी मागण्यास तयार

अभिनेता इमरान हाश्मीने नुकतीच एका वेबसाइटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो त्याचे चित्रपट, करिअर, फिल्म इंडस्ट्रीतील वाद यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इमरानच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दलचा वाद सर्वाधिक चर्चेत ठरला होता. ‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये त्याने ऐश्वर्याची तुलना प्लास्टिकशी केली होती. यावरून त्याच्यावर बरीच टीकासुद्धा झाली होती. आता बऱ्याच वर्षांनंतर तो या वादावर व्यक्त झाला. करणच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोच्या चौथ्या सिझनमधील एका एपिसोडमध्ये इमरानने हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये त्याने अभिनेत्री ऐश्वर्या रायला ‘प्लास्टिक’ असं म्हटलं होतं. रॅपिड फायर राऊंडदरम्यान जेव्हा करणने इमरानला विचारलं की, प्लास्टिक शब्द म्हणताच तुझ्या डोक्यात पहिलं नाव काय येतं? तेव्हा इमरानने ऐश्वर्याचं नाव घेतलं होतं.

काय म्हणाला इमरान?

‘लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत इमरान म्हणाला, “त्या वक्तव्याबद्दल मला माझीच खूप लाज वाटते. मी हेसुद्धा सांगू इच्छितो की मी ऐश्वर्या रायचा खूप आदर करतो. मात्र माझं ते वक्तव्य अपमानास्पद होतं. जर त्या शोसंदर्भात याचा विचार केला तर ते ठीक नव्हतं. आता असं झालंय की सोशल मीडियावर लोक फार लवकर नाराज होतात. हल्ली लोक खूप संवेदनशील झाले आहेत. कॉफी विथ करण या शोच्या चौकटीतून पाहिलं तर ती एक मस्करी होती. मात्र हल्लीच्या कल्चरमध्ये लोकांना लगेच वाईट वाटतं. आताचा समाज असा झाला आहे की आता तुम्ही तशा पद्धतीची उत्तरं देऊ शकत नाही.”

इमरानला मागायची आहे ऐश्वर्याची माफी

या मुलाखतीत इमरानला पुढे विचारण्यात आलं की तो कधी ऐश्वर्या रायला भेटला का? त्यावर त्याने एक किस्सा सांगितला. “ऐश्वर्या रायच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी मी तिच्या वॅनिटी व्हॅनच्या बाहेर तीन तास उभा होतो. तिला भेटण्यासाठी मी फार उत्सुक होतो. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. फिल्मिस्तानमध्ये त्यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी माझ्या ‘कसूर’ या चित्रपटाचीही शूटिंग सुरू होती. मला तिला भेटायचं होतं. मात्र ते शक्य झालं नाही. मी वैयक्तिक त्यांना कधीच भेटलो नाही. मात्र जेव्हा कधी मी त्यांना भेटीन तेव्हा मी त्यांची माफी नक्कीच मागेन”, असं त्याने स्पष्ट केलं.

ऐश्वर्याला प्लास्टिक का म्हणाला?

“माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. मी ऐश्वर्याचा खूप मोठा चाहता आहे. शोचा फॉरमॅटच तसा होता. मी काहीच बोललो नसतो तर हॅम्परसुद्धा जिंकू शकलो नसतो. मला ऐश्वर्या खूप आवडते. मला नेहमीच तिचं काम आवडलंय. मला माहित होतं की लोक यावरून खूप मोठा वाद करतील. पण आपण काय करू शकतो? लोक नेहमीच कोणत्याही गोष्टीवरून तमाशा करतात”, असंही इमरानने याआधी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -