काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय झालाय. काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या वरुणराजाने आज पुणे, नाशिक, येवला अमरावती येथे हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.
शनिवारी सांगलीतही ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. महाबळेश्वर खोऱ्यातही तुफान पर्जन्यवृष्टी झाली आहे. या पावासामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान पुढील आठवडा पावसाचा असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय
पुढील ४,५ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. साधारणपणे पुढील आठवड्यात वरुणराजा दुपारी संध्याकाळी वरुणराजा हजेरी लावेल अशी शक्यता हवामनातज्ज्ञ के एस होसळीकर यांनी वर्तवलीय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
दरम्यान पुढील ३६ ते ४८ तासात पावसाचे पुनरागमन होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनीही एबीपी या वृत्तवाहिनीला दिली होती. पुढील आठवड्यात तापमानात घट होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवलाय. पुढील आठवड्यात पावसासाठी पोषक वातावरण असल्याने वारे जोरदार वाहतील, त्यामुळे झाडं उन्मळून पडणं, वीज कोसळणे, पाणी साचण्याची घटना घडतील, यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, अशी सुचना हवामान विभागाने दिलीय.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती तयार झालीयय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता कमी झाली असून राज्यात सर्व भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. मुंबईसह ठाण्यात देखील पुढील आठवड्यात हलक्या पावसाला सुरूवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
पुण्यात पावसाची जोरदार हजेरी
आज ढगाळ वातावरण अजिबात दिसून आले नाही. सर्वत्र ऊन पडले होते. अशातच अचानक सायंकाळी ५ नंतर वादळी वाऱ्यासह पुण्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून पुणेकर घराबाहेर खरेदीसाठी पडले होते. पण अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच कात्रज, सिंहगड रोड, धायरी, कर्वेनगरम, कोथरूड, हडपसर, भागात जोरदार पाऊस झाला.
वीज पडून मायलेकींचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात गेल्या दोन ते तीन तासापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसात सिललोड तालुक्यातील तालुक्यातील सिसारखेडा येथे शेतात काम करीत असलेल्या मायलेकीवर वीज पडून त्या दोघी जागीच मृत्युमुखी पडल्याय.रेणुका हरिदास राऊत आणि स्वाती हरिदास राऊत असे या मायलेकीचे नाव असून या घटनेमुळे सिसारखेडा गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.