Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगराज्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा धुमाकूळ, उष्णतेच्या लाटेबाबत हवामान विभागाचा...

राज्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा धुमाकूळ, उष्णतेच्या लाटेबाबत हवामान विभागाचा अंदाज काय?

महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. राज्यात पुढील एक ते दोन दिवसांत पाऊस पडणार आहे. त्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे संकट पुन्हा एकदा आले आहे.

 

का पडणार पाऊस?

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रीय असलेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला आहे. परंतु राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच तापमान वाढत आहे. त्यामुळे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्याचा परिणाम ढग निर्माण होऊन पाऊस पडणार आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट अन् पाऊस होणार आहे. वादळे वारे ताशी ३०-४० किमी वेगाने वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. राज्यातील काही भागांत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

 

विदर्भात सर्वत्र ४० च्या वर तापमान

राज्यातील वातावरणात बदल होत असला तरी इतर भागात तापमानात फारशी घट झाली नाही. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा १ ते २ अंश सेल्सिअसने कमी झाला आहे. परंतु विदर्भात उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. राज्यात सर्वाधिक तापमान ४२.४ अंश अकोल्यात होते. अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम येथेही ४० अंशाच्या वर तापमान होते.

 

नाशिक जिल्ह्यात रविवारी अवकाळी पाऊस झाला. नाशिकमधील चांदवडच्या ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसासोबत काही ठिकाणी गारा देखील पडल्या. पावसाने सर्वात जास्त शिरवाडे वणी भागाला झोडपून काढले. त्यामुळे काढणीला आलेला गहू, कांदा या पिकांबरोबरच द्राक्षे बागांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगावमधील रावेरमध्ये अवकाळी पावसामुळे केळीचे नुकसान झाले.

 

नांदेडमध्ये रविवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात हवामान खात्याकडून येलो अलर्ट केला आहे. यापूर्वी झालेल्या वादळीवारा, अवकाळी पाऊस व गारपुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -