Wednesday, September 17, 2025
Homeकोल्हापूरKolhapur: दारूची तस्करी, एक्साइजच्या पथकाने फिल्मी स्टाइलने पाठलाग केला; कारचा टायर फुटल्याने...

Kolhapur: दारूची तस्करी, एक्साइजच्या पथकाने फिल्मी स्टाइलने पाठलाग केला; कारचा टायर फुटल्याने टोळी सापडली

सोलापूरची भाजी गोव्यात नेऊन विकल्यानंतर येताना ११ लाखांची गोवा बनावटीची दारू घेऊन येणाऱ्या तस्करांच्या टोळीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याकोल्हापूर विभागीय भरारी पथकाने जेरबंद केले.

 

कारवाई शनिवारी (दि. ७) मध्यरात्री राधानगरी मार्गावर वाशी आणि हळदी गावच्या हद्दीत सापळा रचून केली. कारवाईची चाहूल लागताच पळून जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने सराईत तस्कर पथकाच्या हाती लागले. पथकाने चौघांना अटक करून त्यांची १५ लाखांची दोन वाहने जप्त केली.

 

ऋषिकेश बिभीषण गायकवाड (वय २६, रा. वाखरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), स्वप्निल उर्फ मुन्ना भीमराव वसेकर (२६), संकेत संतोष सोनटक्के (२१, दोघे रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि सूरज संजय लोंढे (२४, रा. देगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. त्यांच्यावर दारू तस्करीचा गुन्हा दाखल केला असून, तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी झाली.

 

भरारी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी मार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारी दोन वाहने कोल्हापूरच्या दिशेने येणार असल्याची टिप अधिकाऱ्यांना मिळाली होता. त्यानुसार पथकाने वाशी आणि हळदी येथे सापळा रचला होता. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाशी गावच्या हद्दीत संशयित पिकअप वाहन अडवून झडती घेताना त्यात भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे रिकामे कॅरेट आढळले. त्यामागे लपवलेले दारूचे १५२ बॉक्स पथकाच्या हाती लागले.

 

वाहनचालक ऋषिकेश गायकवाड याला अटक करून पथकाने दारू आणि वाहन असा १७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. भाजी विक्रीच्या आडून दारूची तस्करी करीत असल्याची कबुली गायकवाड याने दिली. निरीक्षक के. एम. पवार, दुय्यम निरीक्षक वाय. एम. फटांगरे यांच्यासह सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, योगेश शेलार, आदींच्या पथकाने कारवाई केली.

 

फिल्मी स्टाइलने पाठलाग करून पकडले

 

हळदी येथील पथकाने संशयित कार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कारवाईची चाहूल लागताच कार वळवून तस्कर राधानगरीच्या दिशेने निघाले. पथकाने त्यांचा पाच ते सहा किलोमीटर पाठलाग केला. कारचा टायर फुटल्याने सराईत तस्कर स्वप्निल उर्फ मुन्ना वसेकर आणि त्याचे दोन साथीदार पथकाच्या हाती लागले. त्याच्या कारमध्ये दारूचे ३५ बॉक्स मिळाले. कार आणि दारू असा ८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

 

सोलापुरात विक्री

 

अटकेतील चौघे २० ते २६ वयोगटातील आहेत. यातील मुन्ना हा टोळीचा म्होरक्या असून, तो सराईत तस्कर आहे. गोवा बनावटीची दारू सोलापूर जिल्ह्यातील छुपे विक्रेते, काही वाईन शॉप आणि महामार्गांशेजारी असलेल्या हॉटेल्सना विकली जाते. यातून तस्करांनी लाखोंची कमाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

पोलिस होण्याची संधी हुकली; तस्कर बनला

 

अटकेतील ऋषिकेश गायकवाड हा पोलिस भरतीची तयारी करीत होता. तीन वेळा अगदी थोडक्या गुणांनी त्याची पोलिस होण्याची संधी हुकली. त्यानंतर कमी वेळेत जादा पैसे मिळवण्याच्या उद्देशाने तो दारू तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी झाल्याचे अधिका-यांन सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -