भंडाऱ्याच्या साकोलीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात अवघ्या 15 दिवसाच्या नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री करण्यात आली. मात्र, या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर येऊ नये यासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर याचा दत्तकनामा लिहून घेतल्याचा खळबळजनक प्रकार भंडाऱ्यात उघडकीस आलाय.
हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या साकोली इथं घडला असून भंडारा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी चौकशीअंती या गंभीर प्रकरणाची तक्रार साकोली पोलीसात केली. याप्रकरणी साकोली पोलिसांनी 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यपाल रंगारी (47), सुचिता रंगारी (44), अजित टेंभुर्णे (35), सोनाली टेंभुर्णे (25), नंदकिशोर मेश्राम (45), राकेश टेंभुर्णे (32), पुष्पलता रामटेके (50) या सात जणांविरोधात साकोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे बाळ बाल संरक्षण समितीच्या ताब्यात असून ते एका शिशुगृहात ठेवण्यात आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
साकोली तालुक्यातील एका उपकेंद्रात एप्रिल 2024 मध्ये एका बालकाचा जन्म झाला होता. पंधरा दिवसाचा हा बालक असताना त्याची 70 हजार रुपयांमध्ये विक्री करण्यात आली. मात्र, ही विक्री अवैध असल्यानं त्याचा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा करण्यात आला. आणि हे सर्व करत असतानाही प्रसुती भंडारा शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात झाल्याचं दस्तावेज तयार करून नवीन जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आलं. याची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर करण्यात आली होती. ही तक्रार भंडारा येथील बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांना प्राप्त होताच त्यांनी चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.
पोलिसांच्या कस्टडीतील आरोपी फरार
अचलपूर तालुक्यातील म्हसोना येथील नामदेव बळीराम दहीकर (35) याने भावाशी वाद करत प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी नामदेव दहीकर यास परतवाडा पोलीस तपासाकरीता घटनास्थळी गेले असता नामदेव पोलिसांना चकमा देत फरार झाला. पैशाच्या कारणावरून नामदेव दहीकर याने विलास दहीकर यांच्यावर लोखंडी पाईपने डोक्यावर प्राणघातक हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी युवकाचे वडिल बळीराम दहीकर यांच्या तक्रारीवरुन परतवाडा पोलिसांनी नामदेव दहीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले असता आज पोलिसांनी घटनास्थळी तपासाच्या अनुषंगाने आरोपीला घेऊन गेले असता त्याने पळ काढला. पोलिस म्हसोना परिसरात आरोपी नामदेवचा शोध घेत आहे.