“छावा साकारलेला आहे. ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांच शौर्य आमच्या गोविंदांनी मनोऱ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो. परिवर्तन दहीहंडी या भागात अनेक वर्षांपासून सुरु आहे. आमच्या गोविंदांकरता आकर्षणाच केंद्र आहे. संतोष पांडे ज्या प्रकारे आयोजन करतात, त्या बद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा देतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी वरळी जांबोरी मैदानातील परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर छावा सिनेमातील एक दृश्य साकारण्यात आलं. आजच्या दिवशी राजकीय नेते विविध दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला भेट देत असतात.
दहीहंडी मंचावरुन खाली उतरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परिवर्तन दहीहंडीचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागेल. त्या विकासाच्या हंडीतल जे काही लोणी आहे, ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे”
“दहीहंडीच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करावा, अशी सर्वांना विनंती आहे” इतकी वर्ष लोणी कुठे जात होतं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुठे जात होतं, तुम्हाला माहित आहे. तुम्ही माझ्या तोंडातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय. पण जनतेला माहित आहे, लोणी कोणी खाल्लं”
‘उत्सवावरची बंधनं हटवली’
“दहीहंडी, गणेश उत्सवावर बंधन होती, सगळी बंधनं शिंदे साहेबांच सरकार असताना हटवण्यात आली. आता आमचं सरकार आहे, सगळी बंधन हटवण्यात आलेली आहेत. प्रचंड उत्साह आहे. उत्साहात दंहीहंडी साजरी होतेय” असं फडणवीस म्हणाले. “रात्रीपासून पाऊस पडतोय, आजही पावसाचा अंदाज आहे. कितीही पाऊस पडला, तरी गोविंदाच्या उत्साहाचा पाऊस त्यापेक्षा मोठा आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.