राधानगरी धरणातून सुरू असलेला विसर्ग व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इचलकरंजी जुना पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
शहर व परिसरात सोमवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी ५५ फुटांवर गेल्यामुळे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे व धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे जुना पूल या पावसाळ्यात पाचव्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. धरणातून सुरू झालेल्या विसर्गामुळे नदीची पाणी पातळी १५ फुटांनी वाढली आहे. येथील नदीची इशारा पातळी ६८ फूट असून, धोका पातळी ७१ फूट आहे. पाणी पातळीत वाढ होत असल्याने महापालिकेचा आपत्कालीन विभाग नदी घाटावर सज्ज ठेवण्यात आला आहे.