पोलंडच्या कालिस्ज शहराच्या जवळ असलेल्या एका जंगलामध्ये काही लोक गंमती-गंमतीमध्ये खजाना शोधण्यासाठी गेले होते, आणि त्यांना खरच खजाना सापडला देखील, या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. रिपोर्टनुसार डोनार कालिस्ज नावाचा तरुणांचा एक ग्रुप आहे, ज्यांना जुन्या आणि ऐतिहासिक वस्तू शोधण्याचा छंद आहे. ते जंगलामध्ये जुन्या वस्तू शोधण्यासाठी गेले होते, पाच आठवडे त्यांचा जंगलामध्ये मुक्काम होता. या काळात त्यांनी जंगलातून अनेक वस्तू शोधल्या, त्यामध्ये सर्वात खास आणि किंमती वस्तू होती ती म्हणजे 5 व्या शतकातील सोन्याचा हार, या हाराची किंमत करोडो रुपयांच्या घरात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार हा ग्रुप जून महिन्यात खजान्याचा शोध घेण्यासाठी या जंगलामध्ये गेला होता. सगळ्यात आधी त्यांना त्या जंगलामध्ये एक प्राचीन कबर सापडली, जी रोमन काळातील होती. ज्या कबरीमध्ये रोमन काळातील एका योद्ध्याचे अवशेष होते, त्या कबरीच्या शेजारीच त्यांना एक भाला आणि ढाल देखील सापडली. त्यानंतर त्यांनी तिथे शोध सुरूच ठेवला. त्यानंतर त्यांना काही दिवसांनी तिथे 11 शतकातील एक छोटं मातीचं भांडं सापडलं, ज्यामध्ये 631 सोन्याची नाणी सापडली, ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, मात्र ही तर सुरुवात होती. या जंगाल मोठा खजिना दडलेला असू शकतो, असा या लोकांचा अंदाज होता.
त्यांचा अंदाज खरा ठरला, या ग्रुपला या जंगलामध्ये फिरताना एक सोन्याचा तुकडा सापडला, हा बांगडीचा एखादा तुकडा असावा असं या ग्रुपमधील लोकांना वाटलं. मात्र त्यानंतर मोठा चमत्कार घडला आणि त्याच जंगलामध्ये त्यांना सोन्याचा एक सुंदर असा हार सापडला. जेव्हा त्यांनी हा सोन्याचा हार तपासणीसाठी इतिहास तज्ज्ञांकडे पाठवला तेव्हा त्यांना धक्काच बसला. हा हार तब्बल 222 ग्रॅमचा होता, हा हार पाचव्या शतकातील असल्याचं त्यांना सांगण्यात आलं, इतिहास तज्ज्ञांच्या मते हा हार गॉथिक लोकांचा असून, पाचव्या शतकामध्ये हे लोक या प्रदेशात राहात होते. दरम्यान या वस्तुंमुळे आता या शहराला एक वेगळी ओळख मिळाली आहे. एका रात्रीमधून हे शहर चर्चेमध्ये आलं आहे. पर्यटक देखील या स्थळांना मोठ्या प्रमाणात भेट देत असून, व्यावसाय वाढला आहे.