सार्वत्रिक गणेशोत्सव शांततेत, उत्साहात पार पाडण्यासाठी राजारामपुरी परिसरातील सर्वच गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करीत पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत लेसर किरणांचा वापर व ट्रॅक्टर-ट्रॉलीवर नृत्य करण्यास मनाई केली.
रात्री बारानंतर मिरवणुका बंद राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजारामपुरी परिसरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांची गुरुवारी इंद्रप्रस्थ हॉलमध्ये बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अपर अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील उपस्थित होत्या.
पोलीस अधीक्षक गुप्ता म्हणाले, शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सवाची सुरुवात राजारामपुरीतील सार्वजनिक मंडळांच्या गणेश आगमन मिरवणुकीने होते. आगमन मिरवणुका शांततेत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात यावी, मिरवणुकीला गालबोट लागू नये, याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले. आगमन मिरवणूक मार्गावर येण्यासाठी वाद-विवाद होऊ नयेत, सहभागी होणार्या मंडळांना लकी ड्रॉ प्रमाणे क्रमांक देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी राजारामपुरीतील 51 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते. यंदाचा गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचा निर्धार उपस्थित मंडळांच्या पदाधिकार्यांनी केला.