पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लालकिल्ल्यावरून जीएसटीमध्ये मोठे बदल करणार असल्याचे सांगून दिवाळीत आनंदाची बातमी देणार असल्याची घोषणा केली होती.
त्याप्रमाणे आजच्या (21 ऑगस्ट) मंत्रिगटाच्या बैठकीत जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. जीएसटीमधील नव्या बदलाप्रमाणे 12 टक्के आणि 28 टक्क्यांचे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे 12 टक्क्यांपर्यंतच्या स्लॅबमधील वस्तूंना अंदाजे 5 टक्के आणि 18 ते 28 टक्क्यांपर्यंतच्या स्लॅबमधील वस्तूंना 18 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. दोन स्लॅब रद्द करताना 40 टक्क्यांचा नवा जीएसटी स्लॅब असेल ज्यात महागड्या वस्तूंचा समावेश असेल.
जीएसटीमध्ये लवकरच बदल होतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट रोजी केली होती. त्याप्रमाणे आज (21 ऑगस्ट) झालेल्या जीएसटी मंत्रिगटाच्या बैठकीत दोन स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या जीएसटीमध्ये 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार स्लॅब आहेत. यापुढे केवळ 5 आणि 18 टक्के हे दोन स्लॅब शिल्लक राहणार आहेत. या निमित्ताने जीएसटी 2.0 च्या नव्या पर्वाला आता सुरुवात होणार आहे.
या स्लॅबमध्ये महागड्या आणि व्यसनासंदर्भातील वस्तू, सेवांचा सहभाग असेल. यात पान मसाला, गुटखा, तंबाखू उत्पादने, लग्झरी कार, एसयूव्ही कार, ऑनलाईन गेमिंग आदींचा समावेश असेल.