Saturday, August 23, 2025
Homeमहाराष्ट्रआधी साडीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न फसला; नंतर गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून...

आधी साडीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न फसला; नंतर गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट, CAच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हादरला

आई व बहीण मामासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनाला गेलेली असताना घरात एकटा राहिलेल्या 20 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्याने चक्क गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट घडवून आणला. या भीषण आगीत भाजल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ही घटना जवाहर नगरमधील न्यू शांतीनिकेतन कॉलनी येथे घडली.

 

मृत तरुणाचे नाव ओम संजय राठोड (वय 20, रा. बंबाट नगर) असे आहे. ओम हुशार व अभ्यासू विद्यार्थी होता. तो सीएच्या शिक्षणाची तयारी करीत होता. दहावीमध्ये त्याने तब्बल 93 टक्के गुण मिळवले होते. कुटुंबासह तो बंबाट नगरमध्ये राहत होता. मात्र महाविद्यालय दूर असल्याने तो जवाहर नगर भागातील काकांच्या घरी राहण्यास जात असे, घटनाकाळी ओमचे वडील घरी होते. आई आणि बहीण काही दिवसांपूर्वी मामासोबत दर्शनासाठी निघाल्याने घरात फक्त वडील आणि तोच होता. बुधवारी दुपारी वडिलांसोबत घरातून बाहेर पडलेला ओम, महाविद्यालयात चार्जर विसरल्याचे सांगून थेट काकांच्या घरी पोहोचला. काकूंशी तो नेहमीप्रमाणे गप्पाही मारत होता. यावेळी तो तणावाखाली आहे, असे काहीही जाणवले नव्हते.

 

दरम्यान, मृत्यूपूर्वी त्याने वडिलांनाही फोन करून ‘जेवण केले का, काळजी घ्या’ असे सांगून फोन ठेवला होता. यानंतर थोड्याच वेळात काकू मुलाला शाळेतून आणण्यासाठी बाहेर गेल्या. परत आल्यानंतर त्यांनी ओमला हाक मारली, मात्र घरातून कोणताही प्रतिसाद आला नाही. शंका आल्याने त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. इतक्यात घरातून मोठा आवाज झाला आणि गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. आवाज ऐकून नागरिकांनी घरात धाव घेतली. स्वयंपाकघरात ओम पेटलेल्या अवस्थेत दिसून आला. शेजाऱ्यांनी तातडीने बेडशीट टाकून त्याच्या अंगावरील ज्वाळा विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ओम गंभीर भाजला गेला. तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.अग्निशामक विभागाचे अधिकारी विजय राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. तपासात असे आढळून आले की, गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर काढून गॅस लीक व्हावा यासाठी कात्री अडकवण्यात आली होती. या आगीत घराचे दरवाजे, खिडक्या तसेच किचनमधील साहित्य जळून खाक झाले.

 

ही आग वेळेत विझवली नसती, तर मोठा स्फोट होऊन आसपासच्या घरांनाही मोठे नुकसान झाले असते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -