शेअर मार्केटसह कमोडिटी मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा जादा परतावा देण्याच्या बहाण्याने गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालून पसार झालेल्या दाम्पत्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासाधिकार्यांनी केले आहे.
प्रसाद विनायक धर्माधिकारी, अश्विनी प्रसाद धर्माधिकारी (रा. मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. पसार झालेल्या संशयित दाम्पत्यास लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले. फिर्यादी विजय नामदेव पोळ, त्यांचे बंधू चंद्रकांत व रमेश पोळ यांना जादा परताव्याच्या आमिषाने दाम्पत्याने 75 लाख 90 हजाराला गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय सुधर्म अभ्यंकर (1 लाख 80 हजार), योगेश पोतदार (8 लाख), बाळासाहेब पोवार (2 लाख), ऋषीकेश प्रकाश पाटील (4 लाख) यांना दाम्पत्याने गंडा घातला आहे.
पोळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 2 डिसेंबर 2020 ते एप्रिल 2025 या काळात शेअर मार्केट आणि कमोडिटी मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा जादा परतावा देण्याचे दाम्पत्याने आमिष दाखविले. दाम्पत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीसह त्याच्या भावांनी एकूण 95 लाखाची गुंतवणूक केली. त्यावर 19 लाख 10 हजारांचा परतावा देऊन उर्वरित 75 लाख 90 हजारांची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली. गुंतवणूक केलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करून संशयित दाम्पत्य पसार झाल्याचे म्हटले आहे.