भारतीय संघ आशिया कप 2025 स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धेतील सामने 20 ओव्हरचे असणार आहेत. आशिया कप स्पर्धेसाठी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघात 15 खेळाडूंना संधी देण्यात आली. तर राखीव म्हणून 5 जणांचा समावेश करण्यात आला आहे. आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ यूएईला केव्हा निघणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडिया भारत केव्हा सोडणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया केव्हा निघणार?
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ 4 सप्टेंबरला दुबईसाठी रवाना होणार आहे, याबाबतची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडिया 4 सप्टेंबरला संध्याकाळपर्यंत दुबईला पोहचेल. तसेच टीम इंडिया 5 तारखेपासून सरावाला सुरुवात करणार आहे. या सराव सत्राचं आयोजन हे दुबईतील आयसीसी क्रिकेट एकॅडमीत करण्यात येणार आहे.
याआधी कोणत्याही दौऱ्यावर जाण्याआधी मुंबईला एकत्र व्हायचे. त्यानंतर भारतीय संघ एकत्रित रवाना व्हायचा. मात्र आता खेळाडूंना त्यांच्या शहरातून थेट दुबईत पोहचण्यास सांगितलं जाणार आहे. तर काही खेळाडू हे मुंबईवरुन दुबईसाठी निघतील.
आशिया कप 2025
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच 6 ऐवजी 8 संघ खेळणार आहेत. तसेच ओमानचं यंदा आशिया कप स्पर्धेत पदार्पण होणार आहे. आशिया कप स्पर्धेतील या 8 संघांना 2 गटात समसमान पद्धतीने विभागलं आहे. बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग बी ग्रुपमध्ये आहेत. तर भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान ए ग्रुपमध्ये आहेत.
भारताचा पहिला सामना केव्हा?
दरम्यान 9 सप्टेंबरला स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बी ग्रुपमधील अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग आमनेसामने असणार आहेत. तर टीम इंडियाचा आशिया कप मोहिमेतील पहिला सामना दुसऱ्याच दिवशी 10 सप्टेंबरला होणार आहे. टीम इंडिया आपल्या पहिल्या सामन्यात यजमान यूएई विरुद्ध खेळणार आहे.
भारताच्या दुसऱ्या सामन्याची साऱ्या क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा लागून आहे. हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हा सामना होणार आहे. तर साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात डेब्यूटंट ओमान असणार आहे. हा सामना 19 सप्टेंबरला होणार आहे.