मान्सूनच्या जोरदार सरींमुळे देशातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रात गणेश विसर्जनाच्या दिवशीही मुसळधार पाऊस पडला, तर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुराची भीषण स्थिती कायम आहे.
नद्या, तलाव आणि धरणे तुडुंब भरून वाहत असून हजारो हेक्टर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली असून शेतं अक्षरशः तलावांमध्ये रूपांतरित झाली आहेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD) राजस्थानातील पाली, जोधपूर, बारमेर, जालोर, सिरोही आणि उदयपूर जिल्ह्यांसाठी 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सततच्या पावसामुळे स्थानिक प्रशासनाने काही जिल्ह्यांमध्ये शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (IMD Weather Alert)
दिल्ली आणि आसपासच्या NCR भागात 9 आणि 10 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता असून, 11-12 सप्टेंबरदरम्यान हवामान ढगाळ राहील व हलक्या सरींची शक्यता आहे. यामुळे उकाड्यातून काही प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
पंजाबमध्ये परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे. राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पूरामुळे 4 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. असंख्य गावे जलमय झाली आहेत तर पिकांचेही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अद्यापही पावसाचा धोका कायम असून प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य सुरू आहे. (IMD Weather Alert)
हवामान खात्याने उत्तराखंडमधील डेहराडून, हरिद्वार, जोशीमठ, लॅन्सडाउन आणि मसूरी या भागांतही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नद्यांमध्ये पाणीपातळी वाढू शकते म्हणून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना व पर्यटकांना नद्यांच्या काठावर न जाण्याचा इशारा दिला आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका असल्याने विशेष सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.