Monday, November 24, 2025
Homeक्रीडाआफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी 'हा' खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन

आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी ‘हा’ खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी केएल राहुलला कर्णधारपद देण्यात आले आहे.

ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत यांचे पुनरागमन झाले आहे. तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांना संघात स्थान मिळाले आहे.

 

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची वनडे मालिका आणि ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे.

 

यातील ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने भारताचा संघ जाहीर केला आहे. दरम्यान, वनडे कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 

शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मानेची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्याबाबतीत बीसीसीआयने फार जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

 

तसेच भारताचा वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता, त्यावा बरगड्यांजवळ दुखापत झाली होती, ज्यातून अद्याप तो पूर्ण बरा झालेला नाही. त्यामुळे तो देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे.

 

त्यामुळे वनडे संघाने नेतृत्व कोणाकडे दिले जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष होते. अखेर निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी केएल राहुलकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. केएल राहुलने यापूर्वी भारताचे १२ वनडे सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून ८ सामने जिंकेल आहेत.

 

याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून अफलातून फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाडचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याला भारताच्या वनडे संघात स्थान मिळाले आहे. त्याने बुची बाबू, दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेत शतके ठोकली होती.

 

तसेच नुकतेच दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतही तो मालिकावीर ठरला होता. त्याने पहिल्या वनडेत शतक केले होते आणि दुसऱ्या वनडेत नाबाद अर्धशतक केले होते. त्याच्या या फॉर्ममुळे अखेर त्याने पुन्हा त्याच्याकडे निवड समितीचे लक्ष वेधले.

 

ऋतुराजसोबतच रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत या तिघांचे भारताच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच तिलक वर्मालाही वनडे संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय यशस्वी जैस्वाल देखील संघात असून त्याला आता गिलच्या अनुपस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

 

भारतीय वनडे संघ – रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल

 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका

 

३० नोव्हेंबर – पहिला वनडे, रांची (वेळ – दु. १.३० वाजता)

 

३ डिसेंबर – दुसरा वनडे, रायपूर (वेळ – दु. १.३० वाजता)

 

६ डिसेंबर – तिसरा वनडे, विशाखापट्टणम (वेळ – दु. १.३० वाजता)

 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिका

 

९ डिसेंबर – पहिला टी२० सामना, कटक (वेळ – संध्या. ७.०० वाजता)

 

११ डिसेंबर – दुसरा टी२० सामना, मुल्लनपूर (वेळ – संध्या. ७.०० वाजता)

 

१४ डिसेंबर – तिसरा टी२० सामना, धरमशाला (वेळ – संध्या. ७.०० वाजता)

 

१७ डिसेंबर – चौथा टी२० सामना, लखनौ (वेळ – संध्या. ७.०० वाजता)

 

१९ डिसेंबर – पाचवा टी२० सामना, अहमदाबाद (वेळ – संध्या. ७.०० वाजता)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -