हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. या बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतोय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमानात चढउतार बघायला मिळेल. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. मात्र, राज्यात तापमान वाढत आहे. दुसरीकडे थंडी कमी झाली असतानाही वायू प्रदूषण काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. वायू प्रदूषण वाढल्याने थेट श्वसनाची संबंधित आजार नागरिकांना होत आहेत. शिवाय मास्कशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असूनही देशातील काही भागात पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. राज्यातही वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. तेव्हापासून तापमानात चढउतार दिसत आहे. उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.
पुण्यात तापमानाचा विचित्र खेळ बघायला मिळाला. दहा किलोमीटरच्या अंतरात तब्बल सहा अंशापर्यंत तफावत. वाढत्या शहरीकरणात सुरू असलेली विकास कामे सिमेंटचा वाढता विळखा आणि काही ठिकाणी अद्यापही दाटलेली हिरवाई याचाच परिणाम शहरातील हवामानात होत असल्याचे निदर्शनात येत आहे. गेल्या काही दिवसात शहराच्या काही भागात 9 ते 10 अंश किमान तापमान तर काही भागात किमान तापमान 15° c च्या पुढे असल्याचे दिसून येत आहे.
शहरात अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरात किमान तापमानात तब्बल सहा अंशापर्यंत तफावत असल्याची माहिती समोर आले आहे. देशातील नीचांकी तापमानाची नोंद पंजाबच्या भटिंडामध्ये झाली. भटिंडामध्ये 0.6 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाड येथे 7.7 अंश सेल्सिअस तापमान होते. भंडारा, गोदिंया आणि मालेगाव येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आज राज्यातील तापमानात चढउतार बघायला मिळेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण असेल आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यासोबतच तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमधील अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे.





