मकरसंक्रांतीसारख्या (Pune Accident) सणाच्या दिवशी काळेवाडी परिसरात (Pune Crime) काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)
ही भीषण घटना बुधवारी दुपारी काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ घडली. ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय -24) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय -20, रा. पुनावळे) अशी मृत बहिणींची नावे आहेत. अपघातानंतर दोघींनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील शिंदे कुटुंबाचा मिरची कांडपचा व्यवसाय आहे. ऋतुजा आणि नेहा या कुटुंबातील दोनच मुली होत्या. ऋतुजाने एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले होते, तर नेहा महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. बुधवारी दोघी बहिणी काही कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना काळेवाडी येथे भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेचा जोर इतका भीषण होता की दोघी बहिणी रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचालक जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्यप्रदेश) याला तात्काळ ताब्यात घेतले.
दरम्यान, संक्रांतीच्या दिवशीच दोन तरुण मुलींचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पुनावळे व काळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आनंदाचा सण शिंदे कुटुंबासाठी आयुष्यभर न भरून येणाऱ्या दुःखात बदलला असून, या अपघाताने पुन्हा एकदा भरधाव वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे






