कुटुंबियानंतर लहान मुले सगळ्यात जास्त सुरक्षित शाळेत म्हणजेच विद्येच्या मंदिरात असतात. मात्र याचं विद्येच्या मंदिरात मुलींसोबत वारंवार गैरवर्तनाच्या घटना घडत आहेत. बदलापूरमध्ये काल परवा घडलेली घटना ताजी असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वर्ग शिक्षकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थिनीने घडलेल्या प्रकाराबाबत कुटुंबीयांना सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाच्यता फुटली आणि संबंधित शिक्षकाने इतर तीन ते चार विद्यार्थींसोबत गैरकृत्य केल्याचा प्रकार उघड झाला. नराधम शिक्षकाविरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे.
सचिन गोणारकर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ गजाआड केलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून या नराधम शिक्षकाने आणखी असे काही प्रकार केलेत का? याची महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे.
शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन विद्यार्थिनींवर वर्ग शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.





