बारावीच्या परीक्षेचे पेपर देणाऱ्या स्नेहा शिवाजी सोनवणे (वय १९, रा. कनाननगर) हिने काल दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Class 12 student case Kolhapur 2026) केली.
रविवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे पाऊल उचलण्यामागे परीक्षेचा तणाव की अन्य काही कारण आहे याचा तपास पोलिस करीत आहेत. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, सोनवणे कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचे असून, तिचे वडील गवंडी काम करतात. रविवारी तिचे वडील शेतीच्या कामानिमित्त गावे गेले होते. बारावीची परीक्षा सुरू असल्याने स्नेहा इकडेच थांबली. तर, आई अनिता व बहीण मानसी कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या.
दुपारी बाराच्या सुमारास अनिता सोनवणे घरी परतल्या असता स्नेहाने आतून दार बंद केले होते. बराच वेळ हाक देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता स्नेहाने घराच्या तुळईला गळफास घेतल्याचे दिसून आले. मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा केला. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
आत्महत्येमागील कारणाचा शोध सुरू, मोबाईल गायब
स्नेहाजवळ मोबाईल होता; परंतु, घरात कोठेच तिचा मोबाईल मिळून आलेला नाही. तिच्यावर अभ्यासाचा तणाव होता का?, तिने शेवटचे काही कॉल कोणाकोणाला केले?, कोणाशी काही वाद झाला होता का?, याचा तपास केला जाणार आहे. कुटुंबीयांनाही आत्महत्येमागील नेमके कारण माहिती नसल्याने पोलिस अधिक तपास करणार आहेत.
बारावीची परीक्षा सुरू असतानाच…
शिवाजी सोनवणे पत्नी, दोन मुली व मुलासोबत कनाननगरात राहण्यास आहेत. गवंडी काम करून ते मुलांना शिकवत होते. स्नेहानेही बारावी उत्तीर्ण होऊन नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा होती; परंतु, परीक्षा सुरू असतानाच तिने केलेल्या आत्महत्त्येमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.








