आरोग्य अर्थसंकल्पात पात मधुमेहजन्य नेत्ररोगासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित मोफत नेत्रतपासणी व उपचार सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत मधुमेहजन्य रुग्णांचे स्क्रिनिंग व उपचार मोफत करून दिले जातील.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मधुमेह (डायबिटीस) आणि उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) रुग्णांसाठी डोळ्यांच्या तपासणीसाठी विशेष एआय-आधारित स्क्रीनिंग मोहीम राबविण्यात येणार आहे. प्राथमिक टप्प्यात काही निवडक प्रभागांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबईत विस्तार करण्यात येईल.
महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये येणाऱ्या डायबिटीस रुग्णांची वर्षातून किमान एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक असते. विशेषतः चार-पाच वर्षांपेक्षा अधिक काळ मधुमेह असलेल्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत दवाखान्यांमध्ये विशेष यंत्रणा बसवण्यात येईल. रुग्णांच्या डोळ्यांचे इमेजेस काढून ते कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीकडे पाठविण्यात येतील. एआय प्रणालीद्वारे संशयित रुग्णांची ओळख पटविण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालये, महापालिकेची मोठी रुग्णालये किंवा संबंधित एनजीओच्या नेत्ररुग्णालयांमध्ये पाठविण्यात येईल.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी एनजीओंसोबत भागीदारी करण्यात आली असून, स्क्रीनिंग टीम व आवश्यक उपकरणे त्यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संशयित रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना (एमजीपीवाय) किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत मोफत उपचार दिले जाणार आहेत.
याबाबत कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्ष शाह म्हणाल्या, “डायबिटीस आणि हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांच्या डोळ्यांची एआय-आधारित स्क्रीनिंग करणार आहोत. डोळ्यांचे इमेजेस एआय प्रणालीकडे पाठवून संशयित प्रकरणे ओळखली जातील. ज्यांच्यात समस्या आढळेल, त्यांना तातडीने वैद्यकीय महाविद्यालये, महापालिकेची रुग्णालये किंवा भागीदार एनजीओच्या नेत्ररुग्णालयांत मोफत उपचारासाठी रेफर केले जाईल. सुरुवातीला काही प्रभागांत ही मोहीम राबवून प्रतिसादानुसार संपूर्ण मुंबईत टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल.”
महानगरपालिकेच्या प्राथमिक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या मधुमेह रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, नियमित तपासणीद्वारे डोळ्यांचे विकार लवकर टप्प्यात ओळखून अंधत्व टाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.






