Wednesday, March 4, 2026
Homeकोल्हापूरकागल राज्यमार्गावर भीषण अपघात, दोघे दुचाकीस्वार ठार; बाळूमामा दर्शनासाठी जाताना काळाचा घाला

कागल राज्यमार्गावर भीषण अपघात, दोघे दुचाकीस्वार ठार; बाळूमामा दर्शनासाठी जाताना काळाचा घाला

कागल-निढोरी राज्यमार्गावर बामणी फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोघाही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू; तर पाठीमागे बसणारे दोघे जण गंभीर जखमी झाले.

 

अविनाश भीमराव पाटील (वय ३२, कोगील खुर्द, ता. करवीर) आणि अविनाश विलास झेंडे (मोहरे, ता. पन्हाळा) अशी मृतांची, तर शहाजी परीट (कोगील खुर्द) व सूरज गणपती पाटील (वय २८, साळशी, ता. शाहूवाडी) अशी जखमींची नावे आहेत.

 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मोहरे (ता. पन्हाळा) येथील अविनाश झेंडे व सुरेश पाटील हे दोघे जण मोटारसायकलवरून आदमापूर येथे संत बाळूमामांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते दोघे मोहरे या आपल्या गावाकडे जात होते. याचवेळी कोगील खुर्द (ता. करवीर) येथील अविनाश पाटील व शहाजी परीट हे दोघे मोटरसायकलवरून कोगील गावावरून निघून खेबवडे गावाकडे चालले होते.

 

दरम्यान, बामणी फाटा येथे आल्यानंतर या दोन मोटारसायकलींची समोरसमोर धडक झाली. सर्व जण खाली कोसळले. यावेळी अविनाश पाटील व अविनाश झेंडे या दोघांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले व उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला; तर शहाजी परीट व सुरेश पाटील हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणाक नुकसान झाले आहे.

 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सूरज पाटील यांच्या दोन्ही गुडघ्यांना मोठी इजा झाली आहे. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे पाठविण्यात आले आहे. तर शहाजी परीट यांच्यावर कणेरी मठ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे मोहरे आणि कोगील परिसरात शोककळा पसरली आहे. कागल पोलिस अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -