Tuesday, April 14, 2026
Homeमहाराष्ट्रयात्रेला जाताना जीपची दुचाकीला धडक, 5 वर्षांच्या चिमुकल्याचा डोळ्यादेखत मृत्यू; आई-वडील आणि...

यात्रेला जाताना जीपची दुचाकीला धडक, 5 वर्षांच्या चिमुकल्याचा डोळ्यादेखत मृत्यू; आई-वडील आणि बहीण गंभीर जखमी

वाठार-वारणानगर मार्गावरील वाठारजवळ भरधाव जीपने धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीवरील बालक जागीच (Child Death Road Accident) ठार झाले. तर त्याच्या आई -वडिलांसाह सहा जण गंभीर जखमी झाले.

 

धैर्यशील उदय जाधव (वय ५ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. हा अपघात रात्री उशिरा झाला. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

 

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाठार – वारणानगर मार्गावर वारणानगरहून भरधाव वेगाने आलेल्या जीपने (केए २९ ए ६८१५) तळसंदे गावच्या वळणावर एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत मोहन बाबासाहेब शेटे (वय ५५, रा. कुळरप, ता. वाळवा, जि. सांगली) व माधुरी अनिल बुढ्ढे (रा. पारगाव) हे दोघे जण जखमी झाले.

 

या दुचाकीला धडक देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात जीपच्या चालकाने गाडी भरधाव वेगाने वाठारच्या दिशेने नेत असताना वाठारजवळील एका बझारच्या पेट्रोलपंपासमोर या जीपने वाठारकडून येणाऱ्या टाटा सुमोला धडक दिली. यात सुमोचे तोंड वाठाराच्या दिशेला झाले. दरम्यान, काही अंतरावर जीपने समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन ती रस्त्याकडेच्या नाल्यात जाऊन अडकली. या धडकेत दुचाकीवरील अविनाश उर्फ उदय अशोक जाधव (वय ३४), त्यांची पत्नी प्रियांका (२८), मुलगी किर्तिका (११) व मुलगा धैर्यशील हे रस्त्यावर फेकले गेले.

 

यात लहानगा धैर्यशील जागीच ठार झाला. गंभीर जखमी अवस्थेत उदय, प्रियांका व किर्तिका यांना वडगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना नाणीज मठाच्या रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातस्थळी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे व सहायक पोलिस निरीक्षक राजू साळुंखे यांच्यासह महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

 

चावरेच्या यात्रेला जाताना दुर्घटना

 

चावरे (ता. हातकणंगले) येथे यात्रा होती. यात्रेला जाधव कुटुंबीय मोटारसायकलवरून निघाले असताना अपघात झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -