मुलीच्या हळद काढण्याच्या कार्यक्रमाची घरात तयारी सुरू होती. अचानक वडिलांना काय वाटले कुणास ठाऊक त्यांनी थेट जवळच असलेल्या रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या (Kolhapur Rankala Lake case) केली.
कष्टातून संसार फुलवलेल्या अरुण दिनकर गवळी (वय ५६, रा. हराळे गल्ली, शिवाजी पेठ) यांच्या या टोकाच्या निर्णयाने मात्र सारा परिसर गहिवरून गेला.
गवळी यांच्या मुलीचे पंधरा दिवसांपूर्वीच लग्न झाले. तिचा हळद काढण्याच्या कार्यक्रम घरी होणार होता. जावई पहिल्यांदाच घरी येणार असल्याने लगबग सुरू होती. सकाळी जेवणासाठी लागणारे साहित्य त्यांनी आणून दिले. पण, अचानक ते घरातून निघून गेले. त्यांनी सकाळी नऊच्या सुमारास घरापासून अवघ्या तीनशे मीटरवरील पद्माराजे गार्डनसमोरच रंकाळा तलावात उडी घेत जीवन संपवले.
काठावरून नागरिकांनी आरडाओरडा केल्याने ही घटना समजली. त्यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला, याचा उलगडा कुटुंबीयांनाही झाला नाही. मितभाषी, कष्टाळू गवळी पत्नी, मुलगी, मुलासह हराळे गल्लीत राहण्यास आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या भावाचेही कुटुंब राहते. ते महाद्वार रोडवरील खेळणीच्या दुकानात काम करत होते. त्यांनी मुलांना काबाड कष्टातून वाढवले. भागातही त्यांनी अनेक माणसे जोडली होती. मुलीचे लग्न ९ मे रोजी झाल्याने घरी आनंदी वातावरण असतानाच अनपेक्षितपणे ही घटना घडली.
तातडीने बाहेर काढले पण…
काठावर काही तरुण पोहायला आले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले. अग्निशमन विभागाचे अमोल शिंदे, किसन पोवार, शुभम कुंभार यांनीही बोटीतून शोध सुरू केला. काही वेळातच गवळी बेशुद्धावस्थेत मिळून आले. त्यांना पाण्याबाहेर काढून सीपीआरमध्ये दाखल केले. तेथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


