मार्केट यार्डातील कोहिनूर ट्रेडर्सच्या गोदामातून भरदिवसा तांदळाच्या पोत्यांची चोरीकेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने मुख्य सूत्रधार अश्विनी दत्ता नाईक (वय 35, रा. महादेव गल्ली, राजेंद्रनगर, कोल्हापूर) हिच्यासह तिघींना अटक केली.
संशयितांच्या घरातून 1 लाख 16 हजार 392 रुपये किमतीची 72 तांदळाची पोती हस्तगत करण्यात आली आहेत.
अश्विनी नाईकसह नम्रता संतोष गायकवाड (वय 32, रा. राजेंद्रनगर), अनिता विनायक चांदणे (35, शाळा क्रमांक 8 जवळ, गंजीमाळ, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अश्विनी नाईक सराईत गुन्हेगार असून तिच्यावर घरफोडी, चोरीप्रकरणी अनेक गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. चौकशीत संशयितांकडून गंभीर गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी व्यक्त केली.
शाहू मार्केट यार्डातील कोहिनूर ट्रेडर्सच्या गोदामातून आठवड्यापूर्वी भरदिवसा तांदळाच्या पोत्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष बरगे, वैभव पाटीलसह पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलांचा छडा लावला. अश्विनी नाईक हिच्या घरावर छापा टाकून पथकाने झडती घेतली. घरात तांदळाची पोती आढळून आली. चौकशीत संशयित महिलांनी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. चोरट्यांना शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.



