‘बिग बॉस मराठी’च्या घरातून सुरू झालेली मैत्री खऱ्या आयुष्यात किती घट्ट असू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ‘झापुक झुपुक’ स्टाईलने वेड लावणारा बिग बॉस विजेता सुरज चव्हाण आता आयुष्यातील एक नवा टप्पा सुरू करतोय.
सर्वांचा लाडका सुरज लवकरच बाबा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवर अखेर त्याची मानलेली बहीण म्हणजेच अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने शिक्कामोर्तब केलं आहे. नुकतंच जान्हवीने सुरजची पत्नी संजनाची चोरओटी भरतानाचा एक अत्यंत सुंदर व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
जान्हवीने भरली सूरजच्या पत्नीची चोरओटी
काही दिवसांपूर्वी सुरज आणि संजनाच्या एका व्हिडिओमध्ये संजनाचा बेबी बंप नेटकऱ्यांच्या नजरेस पडला होता, तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आता जान्हवीनेच हा सस्पेन्स संपवला आहे. महाराष्ट्रात गरोदरपणाचे तीन महिने पूर्ण झाल्यानंतर चोरओटी भरण्याची जुनी परंपरा आहे. संजनाची हीच ओटी भरतानाचा व्हिडिओ पोस्ट करत जान्हवीने कॅप्शनमध्ये लिहिलं, “मार्च महिन्यात भरलेल्या चोरओटीचा व्हिडिओ मी आता शेअर करत आहे. कारण आता अधिकृतपणे सांगायला काहीच हरकत नाही की, आपला सुरज लवकरच बाबा होणार आहे…”
बहिणीचं कर्तव्य चोख बजावलं
या व्हिडिओमध्ये जान्हवी अगदी मोठ्या बहिणीच्या हक्काने संजनाची ओटी भरताना आणि तिचे लाड करताना दिसत आहे. तिने सुरजलाही मोठ्या मायेने जवळ घेत लवकरच आत्या होणार असल्याचा आनंद साजरा केला. सुरजच्या लग्नापासून ते त्याच्या नवीन घराच्या गृहप्रवेशापर्यंत जान्हवी नेहमीच एका खऱ्या बहिणीसारखी धावून गेली आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरज चव्हाण आणि त्याची मामेबहीण संजना गोफणे यांचं बारामतीमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. या लग्नाला धनंजय पोवार, पॅडी कांबळे यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आता लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच चव्हाण यांच्या घरात पाळणा हलणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





