सध्या पावसाळा सुरु आहे आणि पावसाळ्यात अचानक फोन पाण्यात पडणं किंवा पावसात भिजणं ही सामान्य गोष्ट आहे. अशावेळी अनेक जण घाईघाईत फोन चालू करून पाहतात, चार्जिंगला लावतात किंवा हेअर ड्रायरने वाळवण्याचा प्रयत्न करतात.
पण अशा चुका फोनचं कायमचं नुकसान करू शकतात. त्याऐवजी तुम्ही जर योग्य पद्धतीने काही सोप्या गोष्टी केल्या तर फोन वाचण्याची शक्यता जास्त पटीने वाढते.
फोन पाण्यात पडल्यावर किंवा पावसात भिजल्यावर सर्वात आधी काय करायचं?
फोन लगेच बंद करा
फोन चालू असेल तर त्वरित बंद करा. त्यामुळे पाण्यामुळे होणाऱ्या शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.
अॅक्सेसरीज काढून टाका
फोनचे बॅक कव्हर, सिम कार्ड, मेमरी कार्ड आणि बॅटरी (काढता येत असल्यास) त्वरित बाहेर काढा. त्यामुळे आत अडकलेला ओलावा लवकर सुकण्यास मदत होते.
मऊ कापडाने पुसा
स्वच्छ सुती कापड, मायक्रोफायबर कापड किंवा टिश्यू पेपरने फोन व्यवस्थित पुसून कोरडा करा. चार्जिंग पोर्ट, स्पीकर आणि इतर छिद्रांमध्ये अडकलेले पाणी बाहेर पडण्यासाठी फोन हलक्या हाताने खालीच्या दिशेने झुकवा.
हेअर ड्रायर वापरू नका
हेअर ड्रायरमधून येणारी गरम हवा फोनमधील नाजूक प्लास्टिक भाग, गोंद आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट्सचे नुकसान करू शकते. शिवाय हवेच्या दाबामुळे पाणी आणखी आत जाऊ शकते.
चार्जिंगला लावू नका
फोन ओला असताना चार्जिंग केल्यास शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे फोन पूर्णपणे कोरडा झाल्याशिवाय चार्जर जोडू नका.
थेट उन्हात ठेवू नका
कडक उन्हात फोन ठेवला तर स्क्रीन, बॅटरी आणि इतर अंतर्गत भागांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तो सावलीत आणि हवेशीर जागेतच सुकू द्या.
वारंवार बटणे दाबू नका
फोन सुरू होतो का हे पाहण्यासाठी वारंवार पॉवर बटण किंवा इतर बटणे दाबणे टाळा. त्यामुळे पाणी आत अधिक पसरू शकते.
जोरात हलवू नका
फोन जोराने हलवणे किंवा आपटणे टाळा. यामुळे आत गेलेले पाणी इतर सर्किट्सपर्यंत पोहोचू शकते.su
फोन तांदळात ठेवणं खरंच फायदेशीर आहे का?
फोन तांदळात ठेवण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. मात्र तज्ज्ञांच्या मते ही पद्धत फारशी प्रभावी नाही. उलट तांदळातील बारीक कण चार्जिंग पोर्ट किंवा स्पीकरमध्ये अडकू शकतात. त्यामुळे फोन नैसर्गिकरित्या कोरडा होऊ देणे किंवा आवश्यक असल्यास अधिकृत सर्व्हिस सेंटरची मदत घेणे हा अधिक सुरक्षित पर्याय आहे.
