अभयारण्य क्षेत्रातील राऊतवाडी धबधबा क्षेत्र सुधारणा आणि पायाभूत सुविधांमुळे सुरक्षित वर्षा पर्यटन स्थळ बनले. पर्यटक आगमनात लक्षणीय वाढ झाली.
मात्र, वाहन तळ सुविधा अद्याप बाकी राहिली आहे. यातून वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली आहे. शेजारच्या माळवर वन्यजीव विभाग, पोलीस यंत्रणा व स्थानिक समितीने वाहनतळ सुविधा निर्माण केली, तरच गर्दी व वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे.
धबधबा स्थळापासून अवघ्या तीनशे मीटरवर डिगेवाडी फाट्यालगत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ५० एकरांहून अधिक विना वापर खासगी मालकीची जमीन आहे. एकाच वेळी जवळपास ३००-४०० वाहनांचे पार्किंग होईल. इतकी मुबलक जमिनीची उपलब्धता असतानाही वाहन सुविधेचा विषय वन्यजीव विभाग, पोलिस व स्थानिक समितीकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
संबंधित जमीन मालकांशी चर्चेतून आणि सहमतीने वर्षा पर्यटन काळात या जमिनीच्या वापरातून तात्पुरते सुरक्षित वाहन तळ निर्माण करणे शक्य आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होण्याच्या दृष्टीने या खाजगी क्षेत्रावर वाहन तळ उभारणीसाठी वन्यजीव, पोलिस आणि स्थानिक समितीने आश्वासक पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.
धबधबा स्थळी रविवारी आणि सुटीच्या दिवशी येणाऱ्या वाहनांची संख्या आणि वर्दळ अधिकच वाढत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच पर्यटक धबधबा स्थळी येण्यास सुरुवात होते. सकाळी आलेले पर्यटक दुपारी दोन वाजेपर्यंत परतीच्या प्रवासाला लागतात. याचवेळी धबधबा स्थळाकडून येणाऱ्या व धबधबास्थळाकडे जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांना त्रास होण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था प्रश्नही संवेदनशील बनू लागला आहे.
वाहनतळ सुविधाअभावी पर्यटक जागी मिळेल तेथे वाहने थांबवून धबधबास्थळी जातात. यातून वाहतूक व्यवस्थेला अडथळा येत आहे. पोलिस यंत्रणेवरील अतिरिक्त ताण वाढत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहून बेशिस्त वाहतूक व पार्किंग समस्या दूर करण्यासाठी, डिगेवाडी फाट्यावर वाहनतळ उभारणीचा पर्याय उपयुक्त ठरणार आहे.
वाहनतळ दृष्टिक्षेप
रविवार व सुटीदिवशी अधिकच भर
गर्दी, वाहतूक कोंडीची तीव्रता वाढते
वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
धबधबास्थळावरील गर्दी नियंत्रित राखा
वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यास पोलिस यंत्रणेस सहकार्य करा
वन्यजीव विभाग, पोलिस, स्थानिक समितीने संयुक्त पाहणी
करून खासगी जमिनीवर वाहन सुविधा निर्माण करावी
जुलै ते सप्टेंबर अखेरीपर्यंत दररोज हजारो पर्यटकांसह वाहनांचे धबधबास्थळी आगमन


