ओटीटी प्लॅटफॉर्मवर जरी ‘लॉकअप 2’ आणि ‘द अलायन्स’ यांसारखे शोज प्रेक्षकांचं मनोरंजन करत असेल तरी, सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोची जितकी क्रेझ आहे, तितकी दुसऱ्या कोणत्याच शोसाठी पहायला मिळत नाही. बिग बॉसच्या नव्या म्हणजेच विसाव्या सिझनची अधिकृत घोषणा झाली आहे.
‘बिग बॉस’ या शोने आता दोन दशकं पूर्ण केली आहेत. या नव्या सिझनचा फर्स्ट लूक निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. हा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. ‘बिग बॉस’च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर विसाव्या सिझनचा पहिला मल्टिकलर ‘आय लोगो’ शेअर करण्यात आला आहे.
‘दोन दशकांनंतर.. अजूनही सर्वाधिक लक्ष वेधणारा बिग बॉसचा डोळा. ‘बिग बॉस 20′ लवकरच येतोय जियो हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीवर’, असं लिहित हा लोगो प्रदर्शित करण्यात आला. परंतु निर्मात्यांनी अद्याप शोच्या प्रीमिअरची तारीख आणि या सिझनचा थीम याविषयी कोणतीच माहिती दिलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 20’च्या हिंदी व्हर्जनचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा सलमान खानच करणार आहे. इतकंच नव्हे तर यावेळी निर्माते एक ऐतिहासिक पाऊल उचलणार आहेत. या शोचे सर्व प्रादेशिक भाषांमधील सिझन्स एकाच वेळी सप्टेंबर 2026 मध्ये प्रीमिअर केले जाणार आहेत. म्हणजेच हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली या सर्व भाषांमध्ये एकाच वेळी शोचं प्रीमिअर होणार आहे.
द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस 20’च्या हिंदी व्हर्जनचं सूत्रसंचालन सलमान खान करणार असून, तमिळ व्हर्जनची धुरा ‘महाराजा’ फेम विजय सेतुपती सांभाळणार आहे. कन्नड व्हर्जनचं सूत्रसंचालन किच्चा सुदीप आणि मल्याळम व्हर्जनचं मोहनलाल करणार आहेत.
यंदा मोठं सरप्राइज बंगाली भाषेतील प्रेक्षकांना मिळणार आहे. कारण बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा क्रिकेटर या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली ‘बिग बॉस बांग्ला’चा सूत्रसंचालक म्हणून पदार्पण करणार आहे.


