बिहारमधल्या दरभंगामध्ये एक फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री एका तरुण इंजिनिअरला महागात पडली आहे. इन्स्टाग्रामवर मैत्रीच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका इंजिनिअरची तब्बल १.५ कोटी रुपयांची फसवणूक झाली. एका तरुणीने त्याला प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवून, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली त्याच्याकडून १.५ कोटी रुपये उकळले. काही काळापूर्वी, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या तरुणीची एका इंजिनिअरशी ओळख झाली. त्यानंतर तिने त्या तरुण इंजिनियरला मैत्री, प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवून, एका उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगवले आणि शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली त्याची १.५ कोटी रुपयांची फसवणूक केली.
नेमकं काय घडलं?
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर, पीडित तरुण इंजिनिअरने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तो दरभंगा जिल्ह्यातील बहेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नवादा गावाचा रहिवासी आहे. दीपक कुमार नावाच्या या पीडित व्यक्तीने आपल्या पोलीस जबाबात असे सांगितले की, सुमारे तीन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याची एका तरुणीशी मैत्री झाली. तिने त्याला प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवून, भविष्यात एकत्र एक उत्तम आयुष्य जगण्याचे स्वप्न दाखवले. पण यातूनच पुढे त्याची फसवणूक झाली.
तीन महिने चाललेली फसवणूक
पीडित इंजिनिअर व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, आरोपी महिलेने शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून तब्बल १.५ कोटी रुपये उकळले. हे पैसे घेऊन ती पसार झाली. फसवणुकीचा हा संपूर्ण प्रकार अवघ्या तीन महिन्यांत घडला. या काळात, संबंधित महिलेने त्या इंजिनिअरला हाताशी धरून त्याच्याकडून ३० वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करून घेतले. पीडित व्यक्तीने सांगितले की, तीन महिने सतत संपर्कात असूनही, ती महिला कधीही व्हिडीओ कॉलवर आली नाही. ती नेहमी तरुणाशी ऑडिओ कॉलद्वारेच संवाद साधायची.
फसवणूक कशी उघडकीस आली?
पीडित तरुणाच्या सांगण्यानुसार, त्याला काही पैशांची गरज होती, म्हणून त्याने आपली जमा केलेली रक्कम परत मागितली. त्या तरुणीने त्यावेळी त्या तरुणाला सांगितले की, मेंटेनन्स सुरू आहे, त्यामुळे रक्कम मिळण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील. दोन-तीन दिवस उलटूनही पैसे न मिळाल्याने दीपकने पुन्हा विचारणा केली, तेव्हा मात्र त्या तरुणीने एक अट घातली. तिने त्याला अट घेतली की, आपली जमा केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी त्याला आधी मूळ रकमेच्या २५ टक्के अतिरिक्त रक्कम भरावी लागेल. तेव्हाच दीपकच्या लक्षात आले की तो फसवणुकीला बळी पडला आहे. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
