नाशिकमध्ये एसटी बसला अपघातानंतर भीषण आग, दोघांचा दुर्दैवी मृत्यू!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नाशिकमध्ये एसटी बसच्या विचित्र अपघातामध्ये दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे पळसे टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने एसटी बसने तीन दुचाकींना धडक दिली. अपघातानंतर एसटी बसला भीषण आग लागली. या आगीमध्येच होरपळून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमी दुचाकीस्वारावर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस नाशिकवरुन पुण्याकडे जात होती. पेट घेतलेली एसटी राजगुरू नगर आगाराची असल्याचे समजते आहे. या एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने ही बस दुसऱ्या बसवर जाऊन धडकली. त्याच वेळी दोन्ही बसच्यामध्ये तीन दुचाकीस्वार आले. या दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला. अपघातामध्ये तिन्ही दुचाकी बसखाली अडकल्या. त्यामुळे दोन दुचाकीस्वारांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाले.

या अपघातानंतर एसटी बसमधील रेडिएटरने अचानक पेट घेतला. अपघातग्रस्त एसटी बसने काही क्षणात रौद्ररुप धारण केले. घटनास्थळावर असलेल्या नागरिकांनी तात्काळ बसच्या काचा फोडून बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीमध्ये एसटी बस जळून खाक झाली आहे. या अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली होती. घटनास्थळावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Join our WhatsApp group