Friday, March 29, 2024
Homeक्रीडालय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय

लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शतकांचा वनवास संपवला.विशेष म्हणजे, रोहितने 3 वर्षांपासून एकही शतक झळकावले नव्हते. त्याने त्याचे शेवटचे शतक 1100 दिवसांपूर्वी म्हणजेच 19 जानेवारी, 2020 रोजी बंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले होते. आता एवढा मोठा वनवास रोहितने मंगळवारी (दि. 24 जानेवारी) एकदाचा संपवून टाकला. यासह रोहितच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.

इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. यावेळी भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात केली होती. यावेळी दोन्ही सलामीवीरांनी संघासाठी 212 धावांची भागीदारी रचली. यामध्ये रोहितने 101 (85 चेंडूत) आणि गिलने 103 (72) धावांचे योगदान दिले.

रोहितचा विक्रम
रोहितने या सामन्यात पहिले शतक झळकावले. त्याने यावेळी 84 चेंडूत 100 धावा करत शतक साकारले. या धावा करताना त्याने 4 षटकार आणि 13 चौकारांचाही पाऊस पाडला. यासह रोहित वनडेत 30 शतकांचा टप्पा गाठणारा चौथा फलंदाज ठरला. रोहितने 234 डावांमध्ये ही कामगिरी करून दाखवली.

वनडेत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने 452 डावात 49 शतके झळकावली आहेत. यादीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या विराट कोहली याने 261 डावात 46 शतके झळकावली आहेत. डावांनुसार बोलायचं झालं, तर रोहित 234 डावात 30 शतकांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, रिकी पाँटिंग याने 365 डावात 30 शतके मारली होती. त्यामुळे तो या यादीत डावानुसार चौथ्या स्थानी आहे.

वनडेत 30 शतकांचा टप्पा पार करणारा रोहित चौथा खेळाडू
49 शतके- सचिन तेंडुलकर (452 डाव)
46 शतके- विराट कोहली (261 डाव)
30 शतके- रोहित शर्मा (234 डाव)*
30 शतके- रिकी पाँटिंग (365 डाव)

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -