Thursday, March 28, 2024
Homeसांगलीसांगली जिल्ह्यात जनावरांचे आठवडी बाजार, बैलगाडी शर्यतीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सांगली जिल्ह्यात जनावरांचे आठवडी बाजार, बैलगाडी शर्यतीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वर्षभरानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या केवळ ११ दिवसातच एक हजार ९२ जनावरे बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लम्पीला प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत.त्यानुसार जिल्ह्यात होणारे जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय होत असलेल्या बैलगाडी शर्यतींवरही बंदी असेल. लम्पीची लाट असल्याने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले की, वर्षभरानंतर जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण राज्यातच लम्पीचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. १ एप्रिलपासून आतापर्यंत १६२९ बाधित जनावरे आढळली आहेत. यातील ७२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ७ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १०१६ जनावरांना लम्पीची बाधा झाल्याने याची लाट आल्याचे स्पष्ट झाले आहे.

लम्पीची लागण जनावरांमध्ये वाढू नये यासाठी आता जनावरांचे आठवडी बाजार यापुढे भरविण्यात येणार नाहीत. अनेकठिकाणी सध्या प्रशासनाची परवानगी घेऊन बैलगाडी शर्यतीही आयोजित करण्यात येत आहेत. यापुढे शर्यतींना बंदी असणार आहे. जनावरांची एका भागातून दुसऱ्या भागात वाहतूक करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.लम्पीची लागण जनावरांमध्ये वाढू नये म्हणून प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार लसीकरणासह पशूपालकांचे प्रबोधनही करण्यात येणार आहे. आतापर्यंत तीन लाख २४ हजार ७५६ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात १०० टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अकरा दिवसात २७ जनावरांचा मृत्यू
वर्षभर लम्पीबाधित जनावरे आढळत असलीतरी त्याचे प्रमाण कमी होते. गेल्या पंधरवड्यापासून मात्र, मोठ्या संख्येने बाधित जनावरे आढळत आहेत. यात अकरा दिवसात १०१६ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे तर यातील १३४ जनावरे बरी झाली आहेत. केवळ अकरा दिवसात २७ जनावरांचा मृत्यू झाला असून, सध्या ८५५ लम्पीबाधित जनावरे जिल्ह्यात आहेत. यात वाळवा तालुक्यात सर्वाधिक ४८८, शिराळा २८३, पलूस २५६, मिरज २३, तासगाव १३, कवठेमहांकाळ १८ तर कडेगाव तालुक्यात ११ जनावरे बाधित आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -