उमदी येथे सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू


उमदी (ता. जत) येथील ओढ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रेणुका शिवानंद ऐवळे (वय ७) व लक्ष्मी शिवानंद ऐवळे (११ )अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. ही घटना रविवारी दुपारी घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उमदी येथील शिवानंद ऐवळे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. ते रविवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान रेणुका व लक्ष्मी या दोघी भाऊ मायाप्पाला घेऊन घरा जवळच असलेल्या ओढ्यात आंघोळ करायला गेल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने दोघीही पाण्यात बुडाल्या.


भाऊ मायाप्पाने आरडाओरड केल्यानंतर शेजारीच गुरे राखत असलेल्या संभाजी माने यांनी डोहात उडी मारुन दोघींना बाहेर काढले. परंतु तत्पूर्वीच दोघींचा मृत्यू झाला होता.


घटनास्थळी आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दोघीही उमदी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये शिकत होत्या.


या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रेणुका व लक्ष्मी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय जत येथे करण्यात आले ही घटना उमदी पोलिसात नोंद आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group