खा. धैर्यशील माने व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात राजकीय कलगीतुरा

खा. धैर्यशील माने व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेट्टी यांनी खा. माने यांना जनता धडा शिकवेल. आगामी लोकसभा निवडणुकीत मी विजय होणार असल्याचा दावा करीत टीकेला सुरुवात केली आहे. त्यानंतर खा. माने यांनी ‘अरे लबाडा’ अशा भाषेत सोशल मीडियाद्वारे तोफ डागली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी खा. माने हे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांच्यावर टिकाटिप्पणी सुरू झाली आहे. चार दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी पुणे येथे धैर्यशील माने यांनी मतदारसंघात किती निधी आणला आणि किती जनतेची कामे केली, असा सवाल उपस्थित केला. धैर्यशील माने यांना जनताच धडा शिकवेल,अशी टीका करीत आगामी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत मी विजय होणार, असा दावाही शेट्टी यांनी केला.

त्यावर खा. माने यांनी टीकेचा बाण सोडला. ‘शेट्टी साहेब मीच केलं, हे नेहमीप्रमाणे सोडायला तयार नाही. लबाडा बस कर रे बाबा!’ यासह विविध पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यामुळे लोकसभा निवडणूक अद्याप लांब असली, तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांमध्ये कलगीतुरा रंगला असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप अवधी असला, तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.

Join our WhatsApp group