मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या पुढील रणनीतीबाबत मोठी घोषणा केली आहे. १२ सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, त्यानंतर मुंबईकडे जाण्याची तारीख निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.“आताच कोणीही मुंबईकडे येऊ नका. १२ सप्टेंबरला अंतरवालीत बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा,” असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत तसेच नांदेड, सांगली, सातारा, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांतील मराठा बांधवांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारच्या हलगर्जीपणामुळे समाजात रोष वाढत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मुंबईकडे जाताना पोलिसांकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, पोलिसांशी संघर्ष करू नका, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले.१२ सप्टेंबरच्या बैठकीनंतर मुंबईकडे कूच करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आता १२ सप्टेंबरच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
