कोल्हापूर शहराला लागून असलेल्या उचगाव येथील बाबा नगर परिसरातील मोरया अपार्टमेंटमधील एका घरात बसवलेल्या स्मार्ट मीटरला पहाटे दोनच्या सुमारास आग लागली.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नवीनच बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरला आग लागल्याने स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची महावितरणकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
आगीची माहिती मिळताच उचगावचे पोलीस पाटील स्वप्नील साठे, गांधीनगर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल भूषण ठाणेकर, मोरे, होमगार्ड तानाजी वळकुंजे तसेच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, कोल्हापूर अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या घटनेत किती नुकसान झाले, याची माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
