भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शनिवारी (२६ सप्टेंबर) महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत वादळी पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भागांतही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर तसेच कोकण किनारपट्टी आणि पुणे, सातारा, नाशिकच्या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
देशातील उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड आणि सिक्कीममध्ये २५ व २६ सप्टेंबरला पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेश, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात २६ व २७ सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तराखंडमध्ये २७ व २८ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि यानममध्ये २६ सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ, माहे व लक्षद्वीपमध्ये २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान, तर किनारपट्टीवरील कर्नाटकात २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
