पेठवडगाव येथील गणपती मंदिरासमोर गुरुवारी (दि.१) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पोखाली दुचाकी आल्याने झालेल्या भीषण अपघातात फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला.
महेक दीपक चावला (वय २३, रा. गांधीनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.
महेक चावला ही पेठवडगाव येथील फार्मसी महाविद्यालयात एम.फार्मचे शिक्षण घेत होती. गुरुवारी महाविद्यालय सुटल्यानंतर ती अॅक्टिव्हा दुचाकीवरून गांधीनगरच्या दिशेने निघाली होती. गणपती मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना तिची दुचाकी आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली आली. टेम्पोचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

