रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील विद्यार्थ्यांच्या सहलीवर काळाने घाला घातला आणि अवघ्या काही तासांत आठ कुटुंबांचा आनंद कायमच्या दुःखात बदलला.
समुद्रात बुडून आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि पर्यटनस्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेनंतर सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही संताप व्यक्त करत समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, ज्या आळंदीतील विनर्स अकॅडमीचे विद्यार्थी सहलीसाठी गेले होते, त्या अकॅडमीवरही आता आळंदी नगरपरिषदेने कारवाई करत मिळकत सील केली आहे. अकॅडमीकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नसल्याचे नगरपरिषदेच्या कारवाईत समोर आले आहे.
आळंदीतील विनर्स अकॅडमीचे विद्यार्थी आणि शिक्षक असे एकूण ४८ जण रायगडच्या दिवेआगर येथे सहलीसाठी गेले होते. यामध्ये २५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षकांचा समावेश होता. गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हे सर्वजण आळंदीहून दिवेआगरच्या दिशेने रवाना झाले. घरातून निघताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, सहलीचा उत्साह होता, पालकांनीही आपल्या मुलांना सुखरूप परत येतील या विश्वासाने निरोप दिला होता. मात्र काही तासांतच या आनंदावर काळाने घाला घातला. दिवेआगरला पोहोचल्यानंतर काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले, तर काही विद्यार्थी किनाऱ्यावर खेळत होते. त्याचवेळी काही विद्यार्थी समुद्राजवळील खड्ड्यांमध्ये अडकल्याची माहिती समोर आली, काही कळायच्या आत मोठी लाट आली. क्षणार्धात परिस्थिती बदलली, आनंदाचं वातावरण आक्रोशात बदललं आणि विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी घटनास्थळी धावपळ सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका, स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ज्या मुलांना पालकांनी हसत-खेळत सहलीला पाठवलं होतं, त्याच मुलांचे मृतदेह काही तासांनंतर घरी परतले. या घटनेनंतर पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही विद्यार्थ्यांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हर्षदा सोनवणे हिनेही घटना घडली त्यावेळी घटनास्थळी आवश्यक सुरक्षा आणि मदत व्यवस्था होती का, असा सवाल उपस्थित केला आहे. तिच्या आजोबांनीही प्रशासनाला याबाबत प्रश्न विचारले आहेत. अनेक पालकांकडून सहलीचे नियोजन, विद्यार्थ्यांवर असलेली देखरेख आणि समुद्रकिनारी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या सगळ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आता विनर्स अकॅडमीवरही कारवाई करण्यात आली आहे. आळंदी नगरपरिषदेने विनर्स अकॅडमीची मिळकत सील केली आहे. अकॅडमीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे अकॅडमीच्या नियमबाह्य कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र अकॅडमीकडे आवश्यक कागदपत्रे नसणे आणि दिवेआगर दुर्घटनेतील थेट जबाबदारी हा स्वतंत्र तपासाचा विषय आहे. विद्यार्थ्यांना सहलीला नेताना आवश्यक सुरक्षा नियोजन करण्यात आलं होतं का, समुद्रकिनारी विद्यार्थ्यांवर पुरेशी देखरेख होती का, धोकादायक समुद्रक्षेत्राची माहिती देण्यात आली होती का आणि दुर्घटना घडली त्यावेळी तातडीची बचाव व्यवस्था कितपत सक्षम होती, या सर्व प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येणं गरजेचं आहे.
आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूने संपूर्ण आळंदीवर शोककळा पसरली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता आळंदी बंद ठेवण्यात आली, नागरिकांनी मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली आणि अत्यंत दुःखद वातावरणात आठही विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आता प्रश्न केवळ या आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा नाही, तर विद्यार्थ्यांच्या सहली आणि पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा आहे. समुद्रकिनारी जाणाऱ्या शाळा, महाविद्यालये आणि खासगी संस्थांच्या सहलींसाठी सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी होतेय का? पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक बचाव यंत्रणा, प्रशिक्षित कर्मचारी आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत का? आणि एखादी दुर्घटना घडलीच तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, याची स्पष्ट व्यवस्था आहे का? या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. कारण सहल आनंदासाठी असते, आठवणी घेऊन परतण्यासाठी असते; पण निष्काळजीपणामुळे ती कोणत्याही कुटुंबाच्या आयुष्यातील शेवटची सहल ठरू नये. दिवेआगरच्या या दुर्घटनेत नेमकी चूक कुठे झाली, कोणाची जबाबदारी होती आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय ठोस उपाय केले जाणार, याची स्पष्टता आता अत्यंत महत्त्वाची आहे.
