भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत आता इलेक्ट्रिक मोटरसायकलींची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. आतापर्यंत इलेक्ट्रिक स्कूटरचे वर्चस्व असलेल्या बाजारात एका भारतीय कंपनीने मोठी कामगिरी केली आहे. बंगळुरूस्थित ओबेन इलेक्ट्रिक (Oben Electric) कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक मोटरसायकली विकण्याचा विक्रम नोंदवला आहे.
‘वाहन’ पोर्टलच्या आकडेवारीनुसार, कंपनीने सप्टेंबर महिन्यात तब्बल १,४१७ इलेक्ट्रिक बाईकची विक्री केली. हा कंपनीच्या इतिहासातील सर्वोत्तम मासिक विक्रीचा आकडा ठरला आहे. विशेष म्हणजे, या यशामागे कंपनीच्या Rorr Evo या इलेक्ट्रिक मोटरसायकलचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे.
१८० किलोमीटरची रेंज अन् दमदार स्पीड
ओबेन Rorr Evo मध्ये ३.४ kWh क्षमतेची LFP बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक १८० किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते. या बाईकचा कमाल वेग ताशी ११० किलोमीटर असून, अवघ्या ३ सेकंदांत ० ते ४० किलोमीटर प्रतितास वेग गाठण्याची क्षमता आहे.
रोजच्या प्रवासासाठी कमी खर्चात पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही बाईक आकर्षण ठरत आहे.
चार्जिंगसाठी किती खर्च?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रति युनिट ८ रुपये वीजदर गृहीत धरल्यास बाईकच्या चार्जिंगसाठी सुमारे ३५ रुपये खर्च येतो. तसेच बॅटरी ९० मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.
विक्रीत ओबेन पहिल्या क्रमांकावर
सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक मोटरसायकल विक्रीमध्ये रिवोल्ट कंपनीने १,०२७ युनिट्ससह दुसरे, तर अल्ट्रावायलेटने ५३६ युनिट्ससह तिसरे स्थान मिळवले. ओबेन इलेक्ट्रिकने १,४१७ युनिट्सची विक्री करत आघाडी घेतली.
कंपनीची विशेष बाब म्हणजे बॅटरी, मोटर, कंट्रोलर आणि चार्जर यांसारखे महत्त्वाचे भाग बेंगळुरू येथील स्वतःच्या उत्पादन केंद्रात तयार केले जातात. त्यामुळे भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक मोटरसायकलींना बाजारात मिळणारी पसंती अधोरेखित झाली आहे.
कमी चार्जिंग खर्च, आकर्षक डिझाइन आणि मोठी रेंज यामुळे इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारात ओबेन इलेक्ट्रिकने आपले स्थान मजबूत केले आहे.
टीप: रेंज, चार्जिंग वेळ आणि खर्च हे कंपनीच्या दाव्यांवर आधारित असून प्रत्यक्ष वापरात बदल होऊ शकतो.

