बेळगाव बाजारपेठेत भाजी दराने शंभरी गाठल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने बाजारात भाजीचा तुटवडा निर्माण झाला असून, त्यामुळेच भाजी दर वाढल्याची माहिती व्यापार्यांकडून देण्यात येत आहे. पण, त्यामुळे सामान्य नागरिकांचे रोजचे आर्थिक गणित कोलमडले आहे. भाजी दर कमी होण्यास किमान पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात भाजीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. कंग्राळी, आंबेवाडी, सुळगा, बेनकनहळ्ळी, मंडोळी, पिरनवाडी, वडगाव, शहापूर, येळ्ळूर, अलारवाड, बसवण कुडची, मुतगा, निलजी, कणबर्गी, मुचंडी या शहराजवळ असणार्या गावांतून भाजीची लागवड प्रामुख्याने करण्यात येते.