कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज गुरुवारी (दि. २०) झाली. संख्याबळानुसार अध्यक्षपद निवड करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे तर काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उपाध्यक्षपदासाठी उत्सुकता लागून राहिली होती.
दरम्यान, सत्तारूढ आघाडीची सकाळी ११ वाजता बैठक झाली. यामध्ये हसन मुश्रीफ आणि राजूबाबा आवळे यांची नावे निश्चित झाली. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे हे आघाडीअंतर्गत पाडापाडीबद्दल आपली स्पष्ट भूमिका सर्व नेत्यांसमोर मांडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे आघाडीच्या बैठकीत वातावरण तापले होते.






