जमिनीचे क्षेत्र वाढवून मिळावे यासाठी एका शेतकऱ्याने लघु पाटबंधारे विभागातच स्वतः ला पेटवून घेऊन आत्मदहन केले होते. आता पुन्हा मयत पतीला न्याय मिळावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी बीडच्या पाली गावातील शेतकऱ्याच्या विधवा पत्नीने थेट स्मशानभूमीत अमरण उपोषणाला सुरुवात केलीय. शेतकऱ्याची ही विधवा पत्नी दोन दिवसांपासून स्मशानभूमीतच भर थंडीत उपोषणाला बसली आहे. मात्र अद्याप एकही प्रशासकीय अधिकारी तिकडे पोहोचला नाही. या प्रकरणात बोलण्यासदेखील तयार नाही. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच गंभीर बनण्याची चिन्ह आहे.
पाली गावातील शेतकरी अर्जुन कुंडलिक साळुंके यांचे शेत भूमी अभिलेख कार्यालयाकडून झालेल्या अनियमिततेमुळे कमी झाले होते. त्यासाठी अनेक वर्षांपासून त्यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु होता. मात्र या प्रकरणी दिरंगाईला कंटाळून अर्जुन साळुंके यांनी 24 नोव्हेंबर 2020 रोजी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन केले होते. बीड येथील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारातच ही घटना घडली होती. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग बीड ,भूमी अभिलेख उपअधीक्षक, बीड उपजिल्हाधिकारी (भूसंपादन या 3 अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल असून 1 वर्ष उलटून गेले तरी पोलिसांनी अद्यापही आरोपींविरुद्ध कारवाई केली नाही. घरातील कर्ता पुरुष अकाली व धक्कादायक रित्या गेल्याने पीडित परिवाराचे सामाजिक व आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान आरोपी अधिकाऱ्यांनी गुन्हा परत घेण्यासाठी पीडित कुटुंबातील व्यक्तींवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत तारामती साळुंके यांनी केली आहे. तसेच स्मशानभूमीतच (26 जानेवारी 2022 पासून) प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण चालू केले आहे.