ताजी बातमी ऑनलाईन टीम
जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून महावितरणला वापरलेल्या विजेची रक्कम कपात केली आहे. ही रक्कम कपात करू नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सावकार मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर आंदोलन करण्यात आले. कारखाना प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करत कपात केलेली २०३ शेतकऱ्यांची ६ लाख ७१ हजार २८५ इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ वर्ग करण्याचे लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
अटल २०२१ शैक्षणिक मानांकनाच्या यादीत डीकेटीई ला देशपातळीवर ‘एक्सलंट’ मानांकन
शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून साखर कारखान्यांकडून शेती पंपाच्या थकीत वीज बिलांची तसेच पाटबंधाऱ्यांच्या थकीत पाणी पट्टीची वसुली सुरू केली आहे. याला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सावकर मादनाईक, सागर शंभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२९) कारखान्यावर आंदोलन करण्यात आले.
दरम्यान आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखाना प्रशासनास धारेवर धरले. यावेळी कारखाना प्रशासनाने शेतकरी सभासदांची संमती असेल तरच ही रक्कम वीज मंडळाला वर्ग होईल अन्यथा नाही असे सांगण्यात आले. मात्र ही रक्कम कपात करायची नाही, अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीच्या वतीने देण्यात आला.
त्यानंतर कारखान्याचे कार्यकरी संचालक मनोहर जोशी यांनी कपात केलेली २०३ शेतकऱ्यांची ६ लाख ७१ हजार २८५ इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करत असल्याचे पत्र दिले त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
दरम्यान , जवाहरचे संचालक व आमदार प्रकाश आवाडे यानी याबाबत जवाहर कारखान्याची भूमिका एका निवेदनाद्वारे स्पष्ट केली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की ,राज्य शासनाने महाराष्ट्र वीज मंडळाच्या माध्यमातून ज्या सभासद शेतकऱ्यांची थकबाकी आहे ती मिळवून देण्यासंदर्भात विनंती केली आहे. त्यानुसार कारखान्याच्या एक्झिक्यूटिव्ह बोर्डाने निर्णय घेतला आहे.
परंतु शेतकरी संघटनाची काही मंडळी राजकीय द्वेषातून जवाहर कारखाना जबरदस्तीने सभासद शेतकऱ्यांची रक्कम कपात करत असल्याचा अफवा पसरवत आहेत. मात्र कारखान्याने तीन ते पाच हजार रुपये पर्यंतच्याच रकमा कपात करून कारखान्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.