राज्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने कोरोनाची रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. आताच्या घडीला तिसर्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविल्यानंतर 50 टक्के रुग्णसंख्या घटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ओमायक्रॉन या व्हेरियंटमुळे आलेली तिसरी लाट ओसरतेय असे म्हणता येईल, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केला.
राज्यात तिसरी लाट सुरू होऊन आता 40 दिवस उलटले आहेत. तिसर्या लाटेदरम्यान एका दिवसात राज्यात सर्वाधिक 47 हजारांइतकी रुग्णसंख्या आढळली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर भागातील रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. दुसरीकडे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे; पण रुग्णसंख्यावाढीचा दर सामान्य आहे. मुंबईनंतर पुण्यात रुग्णसंख्या वाढली होती. तेथेही आता 50 टक्के इतकी घट दिसत आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसर्या लाटेत सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यातील दोन शहरांतील परिस्थिती एकदम समाधानकारक स्थितीत आल्याने राज्यातील तिसरी लाट ओसरू लागल्याचे मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच टोपे यांच्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी ५०२ नवे रुग्ण ( ५ जणांचा मृत्यू ४४४२ सक्रीय रुग्ण )
राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. 45 ते 50 हजार रुग्ण प्रतिदिन सापडल्यानंतर आता सरासरी दैनंदिन 25 हजार इतके रुग्ण आढळून येत आहेत. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथे रुग्णवाढीचा दर कमालीचा घटला आहे. दुसरीकडे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. मात्र, तेथे चिंतेचे कारण दिसत नाही. राज्यात आजच्या घडीला अडीच लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण असले, तरी बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. राज्यातील रुग्णालयांतील उपलब्ध बेडच्या केवळ 7 टक्के बेडवरच रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन आणि आयसीयूमध्ये एक टक्क्याच्या आसपास रुग्ण आहेत.