आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी बँकिंग क्षेत्र , उद्योग क्षेत्र , करदात्यांशी संबंधित अनेक घोषणा केल्या आहेत. या घोषणांमध्ये त्यांनी पोस्ट ऑफिसशी संबंधित देखील घोषणा केली आहे. देशभरातील तब्बल 1.5 लाखांपेक्षा अधिक पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग प्रणालीशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्यांना व्यवहार करणे अधिक सोपे होणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार, पोस्ट ऑफिस सेवेमध्ये अनेक मोठे बदल होणार असून याचा फायदा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांना होणार आहे. यासोबतच 75 डिजिटल बँकिंग युनिटही उघडण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. कमीत-कमी खर्चामध्ये डिजिटल बँकिंगला चालना देण्याचे काम यामार्फत केले जाणार आहे. त्याचसोबत डिजिटल बँकिंगला सरकारचा पाठिंबा कायम असणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.